Pralhad's Blogs

Stories

मनोगत:

आज 1 जुलै. बरोबर 2 वर्षे पूर्ण, म्हणजेच 729 दिवस म्हणजेच जवळ जवळ 10 लाख 50 हजार मिनिटे. झोपेचा काही कालावधी सोडला तर प्रत्येक मिनिट चिंच विसावा ऍग्रोटुरिझमचाच  विचार  डोक्यात आणि आपल्या सारख्याचे बहुमूल्य सहकार्य या मुळे आज चिंच विसावा मानाने उभा आहे. 

मला बऱ्याच जणांनी सांगितले की चिंच विसावा आमच्या गावात आहे, कोणी सांगितले चिंच विसावा आमच्या तालुक्यात आहे, कोणी सांगितले चिंच विसावा आमच्या जिल्ह्यात आहे तर काहींनी सांगितले की चिंच विसावा माझ्या माणदेशात आहे याचा आम्हास अभिमान आहे. माझी पत्नी उज्वला  व मी प्रल्हाद बोराडे म्हणेन की आपल्याला वाटलेला  अभिमान हा आमचा अभिमान आहे.

अगदी प्रामाणिक पणे सांगायचे झाले तर हा 2 वर्षांचा प्रवास खूप खडतर आहे. आपल्यासारखी मंडळी येतात आणि आमचे कौतुक करतात आणि याच मुळे आम्हास  परत हत्तीचे बळ मिळते. आम्ही नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना घेऊन येतो, निसर्ग जोपासतो, जुनी जेवण पद्धती अवलंबतो, सेवाभावी मनोवृत्ती ठेऊन आपली सेवा करतो. 

आजपर्यत चिंच विसावा कुणास आपले माहेर वाटले , कुणास आपलेच फार्म हाऊस वाटले तर काहींना जिव्हाळ्याचे नातेवाइक असा अनुभव आला. 

आम्ही सर्व तो परी प्रयत्न करत आहोत तरीसुद्धा काही आमच्याकडून चुका झाल्या असतील तरी आपण माफ कराव्यात व चिंच विसावा ऍग्रोटुरिझम ला राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय थरावर नेऊन ठेवूयात. खरं तर हे माझे स्वप्न आहे आणि माझ्या स्वप्नपूर्तीचे आपण भागीदार आहात.

परत एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार

उज्वला बोराडे / प्रल्हाद बोराडे

चिंच विसावा ऍग्रोटुरिझम,

शेगांव, ता जत, जिल्हा सांगली

थालीपीठ, दही, ठेचा, खोबऱ्याची चटणी खाल्यावर , मस्त सावली असलेल्या चिंचेच्या झाडाखाली असलेल्या बाजल्याकडे आपल्या जबाबदारीवर जा. 

....कारण झोपला तर तीन तासाच्या अगोदर उठणार नाही वरून आम्हास दोष देऊ नका की झोपायचे पैसे घेतले म्हणून😂😂😂😂😂


आपलाच ...

चिंच विसावा ऍग्रोटुरिझम😊🙏


पाहुणे...

काल आमच्याकडे पाहुणे आले पण थोडं आगळं वेगळं वाटलं.कारण पण तसच आहे. खरं तर त्यात काही जुने व काही नवीन होते. संख्या ही भरपूर होती


येतांच काहींनी मस्त आंघोळ पांगोल केल्या तर काहींनी चक्क नाष्टा करायला सुरुवात केली. बघता बघता अजून पाहुणे आले मग लक्षात आले की यातील काही पाहुण्यांनी परत जाऊन त्यांना घेऊन आले होते. काहींनी तर तीन चार वेळा आंघोळ केल्या.


कपडे म्हणाल तर  काहींनी छान अशी रंगीबेरंगी घातली होती. काहींनी चक्क काळी किंवा पांढरी अशी घातली होती


त्यानी छंद पण जोपासले होते. ते सतत काही तरी गुणगुणत होते पण मला काही ओ चा ठो कळला नाही. मी खूप प्रयत्न केला पण शेवटपर्यंत काही कळले नाही.


सर्व गोष्टी तश्या वेगळ्या वाटत होत्या, बरेच प्रश्न पडले होते पण मी मात्र आदरातिथ्य करत राहिलो कारण आमच्यावर संस्कार ही तसेच ना. म्हणतात ना पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा....


अहो मी फोटो काढायचा खूप प्रयत्न केला पण मला एकाही पाहुण्यांचा फोटो काढता आला नाही. हे काही बुद्धीला न पटणारं होतं कारण दिवसातून दोन चार फोटो काढल्याशिवाय आजकाल दिवस कुठे जातो.


एक गोस्ट मात्र लक्षात आली होती की ते सर्वजण आनंद घेत होते


मंडळी खरं सांगू का काल मी चिंचेच्या बागेला पाटाने पाणी देत होतो त्यावेळेस बरेच पक्षी आले त्यामध्ये कावळा, बगळा, sunbird, पिंक व्हेंट बुलबुल, किंग फिशर  आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्या आल्या होत्या. बघता बघता वर नमूद केलेले दृश्य निर्माण झाले. चला तर मग वाचा परत एकदा आणि कळवा आपली प्रतिक्रिया..

मंडळी,

डोकं गरम होणे माहीत आहे पण जर पाय गरम होत असतील तर काय?


काल डोक्याचे व पायाचे भांडण झाले. पाय म्हणत असे इकडे ये व डोकं म्हणत असे इकडे ये. तिला काहीच सुचेना,  वर यांचा वाद वाढत चालला.  डोकं म्हणत असे तू पायाजवळ किती जास्त वेळ थांबलीस तर तशीच तक्रार पाय तिच्याकडे करत होता. मुविंग टेबल फॅन मधील ती हवा आता स्वतः गरम झाली होती. हे भांडण काल दुपारी घरात टेबल फॅन लावून वामकुक्षीच्या वेळी सुरू होते.


अशा वेळी पायांना आला खूप राग मग त्याने चिंच विसावा ऍग्रोटुरिझम मधील चिंचेच्या झाडाकडे जाण्याचा मार्ग धरला. तिथे झाडाखाली बाजले स्वागत करायला तयार होतेच.


पूर्ण शरीर त्या झाडाखालील बाजल्यावर कधी आडवे झाले कळलेच नाही. आत्ता मात्र डोके व पाय नव्हे तर पूर्ण शरीर त्या चिंचेच्या थंड सावलीत , हळुवार वाऱ्याच्या झुळकीत शांत झाले व डोळे आपोआप बंद झाले.


मंडळी, बघितली ना झाडांची कमाल. येणाऱ्या पावसाळ्यात झाडे लावा म्हणजे डोकं व पाय यांचे भांडण होणार नाही. झाड हे खूप निर्मळ असते ते कधीही डोकं किंवा पाय यामध्ये  दुजाभाव करत नाही.


चिंचेची झाडे लावणार असाल तर रोपांसाठी जरूर मला फोन करा.


पूर्व परवानगीने चिंच विसावा ऍग्रोटुरिझम ला भेट द्या व आपल्या कुटुंब/ मित्रांसोबत मस्त वेळ घालवा.

चिमणी:अहो उन्हाळा भयंकर कडक आहे , तुम्ही घरात चला बघू...


चिमणा: अगं,एक सांगू का तुला, जीव घरात गुदमरतो आहे. अगं स्वच्छदपणे कसे जगावे हे आपले उदाहरण संपूर्ण जग देतंय आणि तू सांगतेस घरात बसा.......?

चिमणी: कबूल आहे धनी , पण कडक उन्हामुळे आपली  काही भावकी पट पट मरत आहेत म्हणून मी अस म्हणाले.

चिमणा: एक उपाय सांगू का तुला..

चिमणी : सांगा की बिगी बिगी..

चिमणा: चिंच विसावा ऍग्रोटुरिझम , शेगांव ता जत जिल्हा सांगली मध्ये खूपच दाट सावली आहे व तो मालक खायला दाणे व प्यायला पाणी देतो.... अजून काय हवंय आपल्याला.

चिमणी: मग कशाला अजून विचार करायचा, हे  बघा चिंच विसावा चा संपर्क मिळाला. ते ........

फेसबुक वर आहेत

इंस्टावर आहेत

गूगल वर आहेत, गूगल मॅप वर आहेत, जस्ट डायल वर आहेत

चिमणा: तिथं जाण्यासाठी ऍडव्हान्स बुकिंग माणसांना करावे लागते पण आपणास फ्री एन्ट्री आहे बरं..


आनंदी व स्वच्छदी जगण्यासाठी निसर्गापेक्षा चांगली जागा असू शकत नाही...


चला तर आपण चिंच विसावा ऍग्रोटुरिझम ला जरूर भेट द्या

आज सकाळी 5 वाजता कोबड्याने बाग दिली आणि जाग आली. मग हळू हळू पक्षाची किलबिलाट मंजुळ गाणी एकावीत अशी कानावर पडली. झुंजूमंजू झाले होते. पण का कोणास ठाऊक मला धन्य वाटले.


मी धन्य आहे कारण सकाळी ठरलेल्या वेळेवर ठरलेल्या ठिकाणी जेवण- पाणी मिळणार होते. पण पक्षाचे काय... शोध मोहिमेवर गेल्यावर मगच काही हाती लागणार की नाही ते कळणार होते.


मी धन्य आहे कारण माझ्याकडे शरीराचे सर्व अवयव आहेत. करा कल्पना की 1 पाय नाही


मी धन्य आहे कारण मला आईने सुसंस्कृत बनवले. 


मी धन्य आहे कारण रात्री छान झोप लागली


मी धन्य आहे कारण मी शुद्ध हवेत दिवसभर झाडाच्या सावलीत असतो


मी धन्य आहे कारण भेटायला येणाऱ्या सर्वांच्या गालात हसू आणतो.


मंडळी, आपल्याकडे अशा भरपूर काही गोष्टी आहेत की आपणास त्याचा गर्व वाटावा. माझी आई नेहमी म्हणत असे की अर्धी भाकरी जरी मिळाली तरी गुण्यागोविंदाने खावी.

गुण्या आणि गोविंदा कोण आहेत माहीत नाही पण गुण्यागोविंदाने या शब्दाचा अर्थ कळला. 


आपणही जरूर विचार करा व कळवा🙏🙏🙏

फराळाचे खायला मिळावे म्हणून उपवास करण्याचा अट्टाहास असे. पूर्ण दिवसभर फक्त फराळाचे खावे लागेल  अशी धमकी दिली जाई पण फराळाचे खाणे कोण सोडणार. यालाच लहानपण म्हणतात🤣🤣


 दुपारनंतर   कोमेजलेले तोंड पाहून आई म्हणायची , खा आता जेवण, लहान मुलांनी एवढाच करायचा असतो. हे ऐकताच मान डोलाउन जेवायला बसने ....याला ही लहानपण म्हणतात😀😀😀

आजच्या उपवास दिनाच्या निमित्ताने लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या ना😊😊😊😊😊

कर्मा ची फळे:

जवळ जवळ आपण सर्वांनी आपल्या मुलांना किंवा दुसऱ्या मुलांना उपदेश करताना, हे सांगितले आहे की पहिली ते 9 वी पर्यन्त खूप अभ्यास करा कारण हाच काळ आहे पाया मजबूत करण्याचा

10 वी मध्ये गेल्यावर सांगितले की बोर्ड आहे त्यामुळे चांगली मार्क्स आले पाहिजेत, नाहीतर admission मिळणे कठीण होऊन जाईल

11-12 वी ला गेल्यावर सांगितले की हा काळ करिअर ठरवणारा आहे त्यामुळे एकदा का चांगले मार्क्स पडले आणि चांगल्या कॉलेज ला ऍडमिशन मिळाले तर काम एकदम फत्ते

कॉलेज ला गेल्यावर सांगितले की CGPA चांगला हवा मग चांगली कंपनी मधे नोकरी मिळेल

तुम्ही अशा खोटया गोष्टी सांगितल्या म्हणून मुलांना  आजकाल शाळा नाही किंवा ऑनलाइन वर काम भागते. मुलांसोबत देव आहे की नाही माहीत नाही पण करोना आहे


15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दिवस मला शाळेत असताना सर्वात मोठा सण वाटत असत..... खरंच बोलतोय सर्वात मोठा सण.......


या दिवसांच्या अगोदर आठवडाभर गुरुजी तयारी करून घेत.


पाहिले काम... शाळा शेणाने सारवणे असे.

गुरुजी  घोषणा सांगत व पाठ करून घेत.


आदल्या दिवशी शाळा लवकर सोडली जायची. ती सुट्टी खरं तर कपडे धुवायची असायची...


घरी लवकर आल्यावर अंगात असलेला शर्ट काढला जाई. येतानाच हिंगणमीठ  आणायचे व शिर्टला हिंगणमीठ लावून मोठ्या दगडावर आपटून धुवायचे...


रात्री सुकल्यावर त्याला इस्त्री केली जायची ....म्हणजे काय तर आई  चुलीवर स्वयंपाक करत असताना भला मोठा आर असे तो तांब्यात टाकायचा व शर्ट प्रेस करायचा व वजनदार वस्तू खाली रात्रभर ठेवायचा. यात टोपी व  खाकी चड्डी चा पण समावेश असे.


दुसऱ्या दिवशी लवकर उठायचे असे.  चुकून उठलो नाही तर म्हणून आई/ वडील मोठे भाऊ यांना उठवायला सांगायचे.


अंगोळ करायची व इस्त्री केलेले कपडे घालत असू... खर तर शर्ट ठीक असायचा पण खाकी चड्डी चे काही खरे नसे. तुम्ही आता समजला असालच की चड्डीला पाठी ठिगळ असे किंवा फाटलेली तरी असे, पण तो पोशाख खातल्यावर मंत्र्या सारखे वाटायचे......

त्या दिवशी मात्र दप्तर न्यायचे नाही त्यामुळे खाकी पिशवीला आराम असे.


शाळेत पोहचल्यावर  झेंडा वंदन झाल्यावर प्रभात फेरी सुरू. आम्हाला जोडीने उभे केले जाई व मित्राचा हात पकडायचा. हात सोडण्यास परवानगी नव्हती. घोषणाबाजी सुरू व्हायची व आम्ही जोर जोरानी घोषणा देत , प्रभात फेरी करत गावातील सार्वजनिक झेंडावंदनासाठी फोहचत असू.


खरंच सांगतो छाती फुगलेली असायची


सार्वत्रिक झेंडावंदन झाल्यावर खाऊ मिळत असे. खाऊ म्हणजे चिरमुरे. 


एकदा चिरमुरे घेऊन झाल्यावर  हात साफ करून, जन्मसिद्ध हक्क असल्यासारखे दुसर्यांदा रांगेत घुसून चिरमुरे मिळवत असू


किती आनंद, किती अभिमान, किती गर्व वाटे या दिवशी....


म्हणूनच म्हणतात

पूर्वी आपला मुलगा मोठा झाल्यावर कुचकामी झाल्यावर त्याला आई म्हणे....

आरं, 

तुझ्यासाठी कष्ट करून करून हात झिजले माझे, हाताच्या काड्या झाल्या.....


आणि समजा आत्ता जर बोलायचे असेल तर......


आरं,

तुझ्यासाठी कष्ट करून करून हाताचे अंगठे झिजले, अंगठ्याच्या रेष पण गायब झाल्या🤣🤣🤣🤣 


तुम्हाला समजले असेलच की आई व्हाट्सअप्प वापरते🤣🤣🤣🤣🤣